स्वच्छता, अहिंसा आणि सत्याग्रह हे गांधीजींचे विचार विश्वशांतीसाठी आवश्यक – डॉ योगिता होके पाटील
माजलगाव – महात्मा गांधींच्या विचारापासून दूर राहील असे एकही क्षेत्र जगात नाही .या महान विभूतीने सामान्य माणसाच्या मनाचा ठाव घेतला व त्याचे हृदय काबीज केले म्हणूनच ते युगपुरुष आहेत असे प्रतिपादन प्रमुख व्याख्यात्या प्रा डॉ योगिता तौर होके पाटील यांनी केले. त्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर भा .शि. प्र. संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, स्थानिक अध्यक्ष प्रकाश दुगड, प्राचार्य डॉ महेश देशमुख, उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना, प्रा संतोष लिंबकर, डॉ प्रेम राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवरांच्या हस्ते म.गांधी,लालबहादूर शास्त्री व श्रद्धेय दत्तोपंत ठेगंडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात केले.
पुढे बोलतांना डॉ योगिता होके म्हणाल्या की,गांधीजीचे विचार संयम, अहिंसा व शिस्त हे आजच्या तरुण पिढीसाठी आवश्यक आहेत. हे त्यांनी अनेक उदाहरणादाखल पटवून दिले .उच्चशिक्षणात गांधीजींच्या सत्य या मूल्यास पुढे ठेवून संशोधनाचा दर्जा वाढवला पाहिजे. स्वच्छता ही मानवी जीवनाच्या विकासासाठी गरजेचे गोष्ट आहे .गांधीजींनी सांगितलेल्या या गोष्टीची कोरोना काळात जाणीव होत आहे .सत्यासाठी सत्याग्रह केला पाहिजे हिंसा नव्हे असे वेगवेगळे गांधीजीचे तत्व सांगून खेड्याचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकणार नाही असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया म्हणाले की कर्तृत्वाने माणसे मोठी होतात महापुरुषांच्या विचारधारांची अमलबजावणी करून ते विचार पूढे नेले पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना यांनी केले तर सूत्रसंचालन उपप्राचार्य युवराज मुळये ,आभार डॉ प्रेम राठोड यांनी केले .पद्य डॉ साधना घडसिंग यांनी सादर केले. शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.