मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी
चि. चैतन्य नरसाळे
माजलगाव प्रतिनिधी दिनांक 25 जानेवारी 2020
मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सिद्धेश्वर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमात बोलताना चि.चैतन्य नरसाळे यांनी व्यक्त केली. चि. चैतन्य नरसाळे हा विद्यार्थी श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात बी.एस्सी. तृतीय वर्षात शिकत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग व श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम प्रसंगी तो बोलत होता. मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, प्राध्यापक ठोंबरे, उपप्राचार्य प्रा. युवराज मुळये यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चैतन्य नरसाळे म्हणाला की आज घडीला मतदानाची टक्केवारी आपण सर्व सुशिक्षित असून देखील घटत चालली आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थी वर्गांचे हे कर्तव्य आहे की आपण मतदानाबाबत समाजामध्ये जाऊन जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे. मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याविषयी प्रयत्न करावयास हवा. जर भारतातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून मतदान केले तर योग्य तो उमेदवार निवडून येईल व आपली लोकशाही बळकट होण्यास मदत होईल असेही तो म्हणाला.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड सर यांनी केला त्यांनीही विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले व लोकशाहीने मतदानाचा अधिकार आपल्यासाठी किती पवित्र अधिकार निर्माण करून दिला आहे याचे महत्त्व त्यांनी विशद केले. भारतीय लोकशाही मध्ये मतदानाच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे काम होऊ शकते परंतु आपण सक्षमपणे मतदान करून हे काम करू शकतो असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक तथा उपप्राचार्य प्रा. युवराज मुळये यांनी केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन होन्ना व प्राध्यापक ठोंबरे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन चि. अनमोल सोळंके यांनी तर आभार चि. प्रवीण येताळ यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 






