विविध संधी परिपूर्तीचे रासेयो हे प्रभावी माध्यम – डॉ. सुरेंद्र आलुरकर
—————————– —————–माजलगाव प्रतिनिधी दि. 17/ 12/ 2019
विविध संधी परिपूर्तीचे रासेयो हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई चे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष युवक-युवती शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड, तसेच मंचावर अमरनाथ खूर्पे, प्रकाश दुगड, सुमंतराव कुलकर्णी, सरपंच विठ्ठल गवळी, उपसरपंच शेख पाशा शेख रहीम, मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, अशोक चंदुरवार, प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड, विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद गायकवाड, विद्यार्थिनी प्रतिनिधी दिव्या रांजवण यांची उपस्थिती होती. स्वच्छता हीच सेवा ही थीम घेऊन दिनांक 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत हे शिबिर माजलगाव तालुक्यातील मौजे नाकलगाव या ठिकाणी आयोजित केले गेले आहे.
डॉ. आलुरकर म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना जर प्रत्येक गावांमध्ये यशस्वीपणे राबविली तर खूप मोलाचे कार्य घडू शकते. कोणत्याही एका गावाचे प्रश्न हे आपल्या देशाचेच सार्वजनिक प्रश्न आहेत. आज – कल सरकार अशा छोट्या-छोट्या माध्यमातून नवयुवकांना देशसेवेची संधी उपलब्ध करून देत आहे. मग या संधीचे सोने कसे करावयाचे हे विद्यार्थ्यांनी ठरविणे गरजेचे आहे. समाजसेवेचे हे वृत्त आपण प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे राबविल्यास देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. प्रमुख मार्गदर्शक अमरनाथ खुर्पे म्हणाले की विषयपत्रिकेवरील सर्व विषय जरी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे राबविले तर हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न होईल. व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. यातूनच सद्गुणांचा विकास होऊन दुर्गुण आपोआपच दूर होतील. के. के. एम. महाविद्यालय मानवत येथील माजी प्राचार्य डॉ. अशोक चंदुरवार यांनीही नेतृत्वगुण सभाधीटपणा, स्टेज डेअरिंग,कौशल्य विकास, या शिबिराच्या माध्यमातून कसे संपादन करता येतील याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड म्हणाले की या शिबिरातून विद्यार्थ्यांनी जे देशसेवेचे व्रत अंगिकारले आहे ते जर पूर्ण करावयाचे असेल तर या सात दिवसात आपणास खूप मोठी संधी आहे. त्याचा सदुपयोग केल्यास निश्चितच या गावाला तुमचा सकारात्मक फायदा होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांनी केला सुरुवातीस कु. अमृता डुकरे, कु. प्रतिभा खांडेकर, कु. सृष्टी विघ्ने यांनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी व उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, कार्यक्रम अधिकारी व उपप्राचार्य प्रा. युवराज मुळये, डॉ. छाया कोदरकर, पांडुरंग झोडगे, राधाकिसन शिंदे,रामहरी शिनगारे, सुरेशराव काठुळे,गणेश राव गुजर, विष्णू गुजर, हनुमान होके, बालासाहेब गटकळ, विजय झोडगे, गणेश गटकळ तसेच अन्नदानाचे काम डॉ. रमेश गटकळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी चि. प्रसाद गायकवाड यांनी तर आभार कु. राखी सोनवणे हिने मानले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका, प्राध्यापक – प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



