संविधानाने माणसाला माणूस पण दिले
प्रा. डॉ. केदारनाथ मालु
…………………………………….
संविधानाने माणसाला माणूस पण दिले असे प्रतिपादन प्रा. डॉ. केदारनाथ मालू यांनी केले. येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री. सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन व शहीद दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड हे होते.
पुढे बोलताना डॉ. मालू म्हणाले की संविधान म्हणजे प्रत्येक भारतीयांच्या अंगावर अंथरलेली उबदार शालच होय. सविधानशिवाय आधुनिक भारताची कल्पनादेखील करणे शक्य होणार नाही. कारण खऱ्या अर्थाने भारत देशाची प्रगती ही संविधानावर आधारलेली आहे. या देशातील संविधान सर्व पायाभूत घटकांना उभारण्याचे स्वातंत्र्य देते. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या चतुसुत्रिसूत्रीचा विकास जितका अधिक तितक्या प्रमाणात भारतीयांची प्रगती अधिक होईल. असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. 1773 साली पहिला भारताविषयीचा कायदा इंग्लंडमध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर 1862 चार्टर ॲक्ट तयार करण्यात आला असून ब्रिटिशांनी भारताविषयी कायदे तयार करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली. 1823 नंतर 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा तयार करण्यात आला. 1935 मधील सुधारणा कायद्यानुसार संपूर्ण प्रांतांना स्वातंत्र्य देण्यात आले. 1937 बी.जी.खैर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे कारण आज इंग्लंडमध्ये राजपद व हाऊस ऑफ लॉर्डस हे सभागृह वंशपरंपरा या तत्वावर निवडले जाते. म्हणून भारताचे संविधान श्रेष्ठ आहे कारण भारतामध्ये प्रत्येक मोठे पद हे जनतेकडून निवडले जाते. तसेच अमेरीकेत सुद्धा राष्ट्राध्यक्ष निवडल्या बरोबर काही मंत्री व काही अधिकारी हे नियुक्त केले जातात. भारतात ही परंपरा नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. कारण मसुदा समितीचे इतर सदस्य दिल्लीबाहेर होते किंवा कोणी आजारी होते, काही बाहेरच्या प्रदेशात होते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत विचारपूर्वक भारतीय राज्यघटना तयार केली आहे. ही राज्यघटना तयार करताना भारतीय लोकांच्या मानसिकतेचा विचार केला गेला आहे म्हणून ही घटना सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड म्हणाले की भारतीय राज्यघटनेची जनजागृती झाली पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकाने राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होईल. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधानाचा स्वीकार केला गेला. म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तसेच 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्यादिवशी खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता भारतामध्ये निर्माण झालेले आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक जिजाराम बागल यांनी केला. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य प्रा. युवराज मुळये यांनी तर कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य प्रा. डॉ. गजानन होन्ना यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच कार्यालयीन कर्मचारी कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून उपस्थित होते.