राष्ट्रीय सेवा योजना चळवळ अधिक गतिमान व्हावी
प्रा. डॉ. प्रेमनंदा घडसिंग
राष्ट्रीय सेवा योजनेची चळवळ अधिक गतिमान व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रेमानंदा घडसिंग यांनी केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री. सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना हे होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आज समाजामध्ये समाज केंद्रीकरणामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही चांगल्या प्रकारे काम करू शकते. समाजाला जागृत करून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम करू शकते. आज कोरोना आपत्तीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अशा प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करून ही भीती दूर करू शकतो असे त्या म्हणाल्या. स्वयंसेवकांमध्ये राष्ट्राभिमुख चळवळ निर्माण व्हावी, राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार-प्रसार व विकास व्हावा, स्वयंसेवकांनी संकटकाळी समाजास मदत करून आपल्या परोपकाराची जाणीव ठेवावी, सामाजिक बांधिलकी निर्माण करावी, आपल्या शिक्षणाचा सदुपयोग समाजाकरता व्हावा म्हणूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजना चळवळ काम करते असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ. कमलकिशोर लड्डा, व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विकास बोरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना म्हणाले की गेली 50 वर्ष राष्ट्रीय सेवा योजना समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम करत आहे आणि स्वयंसेवकाच्या माध्यमातून वेगवेगळी राष्ट्राभिमुख कामेही होत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून स्वयंसेवकांवर राष्ट्र निर्माणाचे व चरित्र निर्मितीचे संस्कार केले जातात आणि हे संस्कार त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. जो स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभागी होतो तो कधीच राष्ट्रच्या विरोधात काम करणार नाही.म्हणूनच राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आहे विद्यार्थीदशेमध्ये अनन्यसाधारण असे आहे असे प्रतिपादनही त्यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय कार्यक्रमाधिकारी अधिकारी तथा उपप्राचार्य प्राध्यापक युवराज मुळये यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गंगाधर उषमवार यांनी केले तसेच आभार प्राध्यापक जिजाराम बागल यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.